सिंदखेड राजा : प्रतिनिधी
अॅग्रो इंडिया गट शेती संघ, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेड राजा येथे ‘आंबा पीक समृद्ध भव्य शेतकरी चर्चासत्र व शिवार फेरी’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अॅग्रो इंडिया गट शेती संघाच्या २६३ व्या द्वादश कार्यक्रमानिमित्त १५ जून रोजी हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक गट शेती व फळबाग तज्ज्ञ डॉ. बी. एम. कापसे यांनी आंबा पिकातील अति घन लागवड या विषयावर सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी जागेत, कमी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक उत्पादन कसे मिळवता येते, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
यावेळी मेहकर उपविभागीय कृषी अधिकारी तुषार वाघ, अॅग्रो इंडिया गट शेती संघाचे गटप्रमुख लक्ष्मण सवडे, सचिव भाऊराव आटपळे, आंबा उत्पादक बागायतदार छगनदादा मेहत्रे, नामदेव आढाव, अनंता खेकाळे, भानुदास तांबेकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आपले अनुभव सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता राजमाता पॅरामेडिकल कॉलेज येथे चर्चासत्राने झाली. त्यानंतर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खंडूराव सखाराम ठाकरे यांच्या शेतावर जाऊन आंबा पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक स्वरूपात ज्ञान मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, नीलेश ठाकरे, उपकृषी अधिकारी सचिन काळे, कृषी विभागाचे अधिकारी के. एम. टाले, बंगाळे, सुशील ढाकणे, पांडुरंग कांगणे, शिवहरी घुगे, रमेश झोरे, शरद पवार, संतोष चेके, गणेश मुंडे, प्रवीण सानप, प्रवीण बगाडे, सुधाकर नागरे, ज्ञानेश्वर नागरे, दीपक काळे, दीपक जाधव, पूजा खरात, पूजा मेहेत्रे, स्वाती गीते, मनीषा खार्डे, खंडू चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
