किनगाव राजा : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या ऐतिहासिक नगरी आडगाव राजा येथे श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव यांनी स्थापन केलेल्या पुरातन हेमाडपंती श्री रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडणार आहे.
या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक विधी, पूजा तसेच पुरातन मूर्तीच्या तेजोतारण विधीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी आमदार मनोज कायंदे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे आणि माजी आमदार संजय रायमूलकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.
धार्मिक महंतांचे लाभणार आशीर्वाद
या जीर्णोद्धार सोहळ्याचे अध्यक्षपद प.पू. गुरुवर्य वे. शा. सं. हभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर भूषविणार आहेत. तसेच साधक आश्रम आळंदी देवाची येथील हभप डॉ. यशोधन किसन महाराज साखरे आणि पोहरादेवी संस्थानचे धर्मगुरु महंत बाबुसिंग महाराज यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होणार आहे.
ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या सोहळ्याला भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराचे विश्वस्त, सदस्य व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
