विहिरीचे बांधकाम ढासळल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको; सजनपुरी येथील दुर्घटना

KHOZ MASTER
2 Min Read

खामगाव : प्रतिनिधी

सजनपुरी शिवारात सुरू असलेल्या सार्वजनिक विहिरीच्या बांधकामादरम्यान सेंट्रिंगची सिमेंटची भिंत अचानक खचल्याने एका मजुराचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रात्री उशिरा मृतदेह शोधण्यात यश आले.

दरम्यान, शोधकार्यात झालेल्या विलंबामुळे संतप्त ग्रामस्थांनी खामगाव-नांदुरा मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सजनपुरी शिवारात नवीन खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे सार्वजनिक विहिरीचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी पहाटे पाच ते सहा मजूर विहिरीच्या सेंट्रिंगचे काम करीत होते. यावेळी भगवान महादेव दांदळे (वय ३०, रा. अटाळी, ता. खामगाव) हे विहिरीतील फर्म्यावर उभे असताना अचानक सेंट्रिंगची सिमेंटची भिंत खचली.

भिंत कोसळल्याने दांदळे यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. त्यानंतर मलब्याचा काही भाग त्यांच्या अंगावर पडल्याने ते पाण्याखाली दबले गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अटाळी येथील नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र घटना घडल्यानंतर चार ते पाच तास उलटूनही प्रभावी शोधमोहीम सुरू झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

तसेच संबंधित कंत्राटदार घटनास्थळी उपस्थित नसल्याने नागरिकांचा संताप वाढला. ग्रामस्थांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर खामगाव-नांदुरा मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाणी उपसा करून शोधकार्य करण्यात आले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला.

घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्यासह शिवाजीनगर पोलीस उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी प्रवीण महादेव दांदळे (वय ४२, रा. अटाळी) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद १७ जून रोजी पहाटे १२.२९ वाजता करण्यात आली असून पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ सुरज राठोड करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *