चपातीपेक्षा भाकरी महाग; भाकरीचे आयुर्वेदिक महत्व वाढले; डॉ.राहूल मेहेत्रे (एम.डी.मेडीसन)
प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव गेल्या अनेक वर्षांपासून सोयगाव तालुक्यात ज्वारीचा धान्य बाजार तेजीत दिसून येतो. गव्हापेक्षा ज्वारीचे भाव वाढले आहे. त्यामुळेच गव्हापेक्षा ज्वारी महाग झाली असल्याचे गृहिणी बोलतात.फर्दापूर येथील हॉटेलमध्येसुद्धा भाकरीची किंमत चपातीपेक्षा जास्त आहे. ज्वारीचा घटता पेरा व आरोग्याला असलेले आयुर्वेदिक लाभ यामुळेच आपसूकच भाकरीकडे अनेक जण वळत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवन शैलीत आहाराला अतिमहत्त्व आले आहे.
आरोग्य बंदिस्त होऊ नये याकरिता प्रत्येक जण सतर्क राहतो, त्यादृष्टीनच आहारातील योग्यता पाहता त्याचे सेवन अनेक जण करतात. विशेषतः पोटाचे विकार पचनक्रिया तसेच बदलण्यासाठी अनेकांच्या घरात ज्वारी आणि बाजरीची भाकरी जेवणात वापरतात. सध्या ज्वारीचा भाव वधारल्यानं सर्वसामान्यांची कष्टाची भाकर महाग झाली आहे. बाजारात २० ते ३५ रुपयांपर्यंत दराने एक किलो ज्वारीची विक्री होत आहे. तर, गहू २२ ते २८ रुपये किलोप्रमाणे असल्याचे विक्रेते सांगतात. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या गॅसकडे फिरताना दिसत आहे.दुष्काळ आणि चालू वर्षी अतिवृष्टीमुळे आणि इतर विविध कारणांमुळे ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने ग्रामीण भागातही चूलीवर सर्रास चपाती दिसू लागली आहे. गत अनेक वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे, अशातच यावर्षी पावसामुळे ज्वारीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात गरिबांची भाकर आणखीनच महागणार असल्याचे चित्र आहे.
ज्वारीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे
“”▪️ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. या आरोग्यदायी ज्वारीचे फायदे अनेक आहेत.
डॉ.राहुल मेहेत्रे (एम.डी.मेडीसन) मेहेत्रे हाॅस्पिटल बुलढाणा
Users Today : 17