प्रतिनिधी प्रविण चव्हाण शहादा
घरकुल प्रकल्प राबविण्यासाठी शासनाचा १९ कोटी ५० लाखांचा निधी शहादा नगरपालिकेकडे असताना सुद्धा गोर गरीब, बेघर कुटुंब घरकुलां पासून वंचित आहेत. त्यामुळे नवीन जागेचा प्रस्ताव तयार करून मंजुरी घेत तिथं म्हाडा योजनेंतर्गत घरकुले बांधून गोर गरीबांना त्याच्या लाभ द्यावा, या मागणी साठी काल दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बेघर संघर्ष समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. समितीचे अध्यक्ष दिलावरशा कादरशा, चिरागोद्दीन शेख, डॉ. रामचंद्र शिंपी यांचे नेतृत्वाखाली हा मोर्चा थेट शहादा येथील प्रांत अधिकारी यांचे कार्यालयावर धडकला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी यांना शिष्ट मंडळामार्फत सादर करण्यात आले.शहादा शहरात यापूर्वी १०२० घरकुलांच्या बांधकामाला शासनाने मंजुरी देत ११ कोटी १० लाख ६ हजार ५०० इतका निधी शहादा नगरपालिकेला दिलेला आहे. सदर प्रकल्प मौजे मलोणी सर्वे क्र.१ व मौजे कुकडेल शिवारातील सर्वे क्र.३ व ६ पै. जागेवर प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र मलोणी ग्रामपंचायतीने घरकुल प्रकल्पाला जागा देण्यास ऐन वेळेस असंमती दर्शवली. तसेच मौजे कुकडेल शिवारातील आयडीएसएमटी योजनेअंतर्गत आरक्षित असलेली सर्वे क्र.३ व ६ पै. जागा घरकुल प्रकल्पासाठी नगरपालिकेने वेळेत बदल करून घेतली नाही. परिणामी निधी असूनही घरकुल प्रकल्प रखडता झाला.शहादा नगरपालिकेने पर्यायी जागेच्या प्रस्ताव शासनाकडे वेळोवेळी सादर करून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत गोर गरीबांना घरकुल बांधून द्यायला हवे होते, परंतु तसे नगरपालिकेने केले नाही. त्यामुळे सदर निधी बँकेत तसाच पडलेला असून बँकेत व्याजासहित १९ कोटी ५० लाख ७२ हजार ९६१ इतका झाला आहे. या निधीतून म्हाडा योजनेअंतर्गत घरकुलाचा प्रस्ताव तयार करून शहरातील गोरगरीब, बेघर कुटुंबांना लवकरात लवकर मोफत घरकुल बांधून द्यावे, अशी मागणी बेघर संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे. तसेच श्रमिक नगर मधील रहिवाशांना अतिक्रमण घरे काढण्याबाबत शहादा नगरपालिकेने नोटीसा बजावले आहेत. त्यांचे अतिक्रमण न काढता, त्यांना आधी हक्काचे घरकुल बांधून द्यावे, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी बेघर संघर्ष समितीचे महिला शहर अध्यक्षा गुड्डी चव्हाण, सादिक अंसारी, मेहमूद अंसारी, सगुपता अंसारी आदी पदाधिकारी व शेकडो महिला लाभार्थी उपस्थित होते.
Users Today : 20