मोटार सायकल चोरी करणाऱ्या 04 आरोपींना अटक. नऊ मोटर सायकल केल्या जप्त.

Khozmaster
6 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: मोटार सायकल चोरी करणाऱ्या 4 आरोपींना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा यांनी अटक केली आहे.  या चोरट्यांकडून 3 लाख 35 हजार रुपये किमंतीच्या नऊ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.      दर्शन कांतीलाल पाटील (19) वर्षे, आणि मयूर किशोर जाधव (21) रा. बोरद ता. तळोदा जि. नंदुरबार, सागर उदयसिंह चौधरी (19) रा. न्यूबन ता. तळोदा जि. नंदुरबार, तोसिफ शेख भिकन शेख (25) रा. संजेरी चौक गरीब नवाज कॉलनी शहादा, या चार आरोपींना अटक करण्यात आले आहे.   अधिक माहिती अशी कि,    नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वाहन चोरीचे घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने 08 जानेवारी 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखे मधील स्टाफ ने तळोदा पोलीस स्टेशन हद्दीतील बोरद ता. तळोदा येथे या भागात सापळा लावून दर्शन पाटील आणि मयूर जाधव यांना ताब्यात घेतले.    नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणेे हे मोठे आव्हान होते. त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.      स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची माहिती घेवुन रेकॉर्ड वरील,जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.    दिनांक 08 जानेवारी 2023 रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की, तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव असे त्यांचा न्युबन येथील एक साथीदाराच्या मदतीने तळोदा, शहादा परिसरातून मोटार सायकली चोरुन आणून शहादा येथील तौसिफ शेख यास विक्री करतात अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. पो. निरीक्षक खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 01 पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमी मधील संशयीतांवर लक्ष ठेवून माहिती घेणे सुचना दिल्या.       स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव यांची माहिती काढली असता, दोन्ही संशयीत इसम नेहमी वेगवेगळ्या दुचाकी वाहन फिरवत असतात व त्यांना भेटण्यासाठी शहादा येथील एक अनोळखी व्यक्ती येत असतो अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 08 जानेवारी 2023 रोजी पहाटेच्या सुमारास बोरद गावातील दर्शन पाटील व मयुर जाधव यांना त्यांच्या शेतातून ताब्यात घेतले, दर्शन कांतीलाल पाटील (19) मयुर किशोर जाधव (21) दोन्ही रा. बोरद ता. तळोदा जि. नंदुरबार . त्यांना मोटार सायकल चोरी बाबत विचारपूस केली असता.  त्यांनी तळोदा, शहादा व म्हसावद येथे त्यांचा न्युबन येथील तिसरा साथीदार सागर चौधरी याचे मदतीने मोटार सायकल चोरी बाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच चोरी केलेल्या मोटार सायकली शहादा येथील तौसिफ शेख विक्री केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ न्युबन गाठून सागर चौधरी याचा शोध घेतला असता तो घरीच मिळून आल्याने त्यास त्याचे नाव विचारले असता सागर उदेसिंग चौधरी (19) रा. न्युबन ता.तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले.       तिन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवून तौसिफ शेख याचा शोध घेतला असता तो, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलीन परिसरात मिळून आला.  तौसिफ शेख भिकन शेख (25) रा. संजेरी चौक, गरीब नवाज कॉलनी, शहादा असे नाव सांगितले. त्यास दर्शन पाटील, मयुर जाधव व सागर चौधरी यांनी चोरी करुन आणून त्यास दिलेल्या मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्याने त्या मोटार सायकली जुना खेतिया रोड येथील गॅरेजच्या पाठीमागे लपवून ठेवल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून तेथून 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 07 मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत.  तळोदा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 328/2022 भा.द.वि. कलम 379,  शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 813/2022 भा.द.वि. कलम 379,  म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 10/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत 04 मोटार सायकली बाबत माहिती घेण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकुण 2 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 07 मोटार सायकली हस्तगत करुन 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.     तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या दुसऱ्या एका पथकाने दिनांक 08 जानेवारी 2022 रोजी सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील टेंबे त.सा. येथील हंसराज बहादुर मालचे (23 ) यास ताब्यात घेवून त्याने सारंगखेडा-टेंभा रस्त्यावरील एका नाल्याच्या पुलाखाली लपवुन ठेवलेल्या 45 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी मोटार सायकल जप्त केलेल्या आहेत. जप्त केलेल्या मोटार सायकल चोरी बाबत सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 297/2022 व गु.र.नं. 07/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.      ताब्यात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या 04 आरोपीतांकडून एकुण 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 09 मोटार सायकल हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे 05 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.          सदरची कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, बापु बागुल, सुनिल पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, मोहन ढमढेरे, किरण मोरे, राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली आहे.

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *