प्रविण चव्हाण
नंदुरबार – :जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षकांसाठी तयार केलेल्या चित्रफितींचे (व्हिडीओ) दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी राज्यभरातील शिक्षकांसाठी प्रकाशन होत असून, हे व्हिडिओ शिक्षकांनी आवर्जून पहावे व त्यांचा दैनंदिन अध्यापन कार्यात उपयोग करावा, असे आवाहन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे .
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांकडून विविध विषय आणि घटकांना अनुसरून अध्यापन कार्याचे कृतीयुक्त व्हिडिओ तयार करण्यात आले. या व्हिडिओचे संकलन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेद्वारे करण्यात येऊन आता ते राज्यभरातील शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
निपुण भारत व एफएलएएन प्रकल्पांतर्गत हे व्हिडिओ तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातील सुमारे 100 उपक्रमशील शिक्षकांनी यात सहभाग नोंदविलेला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या व्हिडिओचा उपयोग होणार असून, नंदुरबारच्या शिक्षकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेले व्हिडिओ सर्व शिक्षकांनी आपल्या अध्यापन कार्यात वापरून विद्यार्थ्यांना विविध संकल्पना स्पष्ट कराव्यात,
असे आवाहन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता तथा विभाग प्रमुख रमेश चौधरी यांनी व्हिडीओ निर्मिती कार्यशालेत मार्गदर्शन केले तर अधिव्याख्याता तथा सहविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र महाजन यांच्या समन्वयातून ही व्हिडिओ निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाभरातील सर्व गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रविण चव्हाण, अधिव्याख्याता वनमाला पवार, संदीप मुळे, पंढरीनाथ जाधव, सुभाष वसावे, विषय सहाय्यक देवेंद्र बोरसे यांच्यासह ज्ञानप्रकाश फाउंडेशन च्या सोनल शिंदे व रविंद्र ढाकरे यांनी या व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेत सहकार्य केले.
दिनांक 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिन हे व्हिडिओ सर्व शिक्षकांसाठी डायट नंदुरबार या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Users Today : 44