प्रविण चव्हाण
नंदुरबार : महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना अटक, 56 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
शहादा पोलीस ठाण्याची दमदार कारवाई.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 28 जानेवारी रोजी प्रताप बुच्या पावरा (29) धंदा नोकरी, रा. साईबाबा नगर, शहादा हे त्यांचे शेलकुई ता. धडगांव येथे त्यांच्या खाजगी कामानिमीत्त गेले होते.
दिनांक 29 जानेवारी रोजी ते शेलकुई ता. धडगांव येथून परत येवून त्यांच्या घरी जात असतांना रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहादा बायपास रोडवर असलेल्या मिरा प्रताप लॉन्स जवळ त्यांच्या पाठीमागून मोटार सायकलवर आलेल्या 3 अज्ञात इसमांनी त्यांना थांबवून त्यांच्या पॅन्टच्या खिशातून 8000/- रुपये रोख, 10,000/- रुपये किमतीचा मोबाईल व त्यांची मोटार सायकल क्रमांक MH-39 AE-4976 असा एकुण 58,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल धक्काबुक्की करुन जबरीने हिसकावून नेला म्हणून म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 45/2023 भा.द.वि. कलम 392,34 प्रमाणे 3 अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच शहादा सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी दाखल झाले.
घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सदर घटने बाबत पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे तसेच इतर अधिकाऱ्यांना कळविले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथक तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करुन आरोपीतांवर कठोर कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
शहादा सहा. पो. निरीक्षक राजन मोरे व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार शहादा व आजू-बाजूच्या परिसरात घडलेल्या गुन्ह्या बाबत माहिती घेत असतांना नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त माहीती मिळाली की, सदरची जबरी चोरी ही सालदार नगर परिसरात राहाणारे भूपेश, सुधाकर यांनी त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने केली असून ते सद्या त्याच परिसरात फिरत आहेत.
सदरची माहीती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना कळवून मिळालेल्या बातमी मधील संशयीतांना ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे व त्यांच्या पथकाने घटना स्थळाचा आजु-बाजूचा परिसर पिंजुन काढला. त्याच दरम्यान नवीन बस स्थानकाच्या मागे असलेल्या काटेरी झुडपातून दोन इसम पळतांना दिसले, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले.
सुधाकर सुभाष माळी (22)
विपुल ऊर्फ भूपेश छोटू कुंवर (22) दोन्ही रा. सालदार नगर, शहादा जि. नंदुरबार . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचा एक साथीदार योगेश गुरव याचे मदतीने केला असल्याची सविस्तर हकिगत सांगितली. तसेच त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून घेतलेले 6000/- रुपये रोख हस्तगत करुन गुन्ह्यातील मोटार सायकल व मोबाईल त्यांचा साथीदार योगेश गुरव याचे कडे असले बाबत सांगितल्याने शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने योगेश पंडित गुरव (22) रा. सालदार नगर शहादा यास त्याच्या घरुन ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातून 10,000/- रुपये किमतीचा मोबाईल व त्यांची मोटार सायकल क्रमांक एम. एच.-39 ए ई – 4976 असा एकुण 58,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्यास ताब्यात घेतले.
शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने महामार्गावरील जबरी चोरीचा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा 12 तासात उघडकीस आणून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केल्याने नागरिकांनी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील व शहादा पोलीस ठाण्याच्या अभिनंदन करून कौतुक केले आहे. तसेच पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी हा गंभीर गुन्हा उघडकीस आणणाऱ्या शहादा पोलीस ठाण्याच्या पथकास रोख बक्षिस जाहीर केले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर .पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस अंमलदार मुकेश राठोड, अनिल पावरा, दिनकर चव्हाण, भरत उगले यांच्या पथकाने केली आहे.
Users Today : 20