प्रविण चव्हाण नंदुरबार -: जिल्ह्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील 14 गुन्हे उघड, 63 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. नंदुरबार जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्द्चे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा घेण्यात येत असतो. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करणे हे मोठे आव्हान होते. त्याअनुषंगाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत निर्देश पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्यांच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस यांची माहिती घेवुन रेकॉर्ड वरील, जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवुन होते. तसेच आपले खबरी मार्फत माहिती घेवून आरोपीतांचा शोध घेत होते. दिनांक 01 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील कोकणी हिल भागात IDBI बँके जवळ एक इसम विना नंबरच्या मोटार सायकलवर फिरत असून त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत आहे अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. पोलीस निरीक्षक खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारातील कोकणी हिल भागात IDBI बँकेच्या परिसरात जावून मिळालेल्या बातमी प्रमाणे संशयीत आरोपीताचा शोध घेत असतांना एक इसम विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पॅशन मोटार सायकलवर बसलेला दिसून आला. विजय रमेश दाभाडे, (29) रा. इंदिरा नगर, भडणे ता. साक्री जि. धुळे. त्यास त्याचे ताब्यातील मोटार सायकलच्या कागद पत्रांबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात चांदीचे 5000/- रुपये किमतीचे गोलाकार पायातील दोन व हातातील दोन कडे, 8000/- रुपये किमतीचे 01 सोन्याचे ओम पदक तसेच त्याचे मोटार सायकलची किक असलेल्या बाजूला 1 लोखंडी टॅमी आढळून आली. त्यास त्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने सदरचे दागिने हे एक ते दिड वर्षापूर्वी नवापूर शहरातील एका बंद घराचे रात्रीच्या वेळी कुलुप तोडून चोरी केल्याचे सांगितले. तसेच ते दागिने नंदुरबार शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने आला असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या वस्तूंच्या वर्णनाचे नवापूर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील गेल्या मालासोबत तुलना केली असता सदरचा मुद्देमाल हा नवापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 707/2021 भा.दं.वि. कलम 454, 457, 380 मधील असल्याचे निष्पन्न झाले. संशयीत विजय दाभाडे याच्या ताब्यात मिळून आलेले सोने,चांदीचे दागिने व मोटार सायकल कायदेशीर कारवाई करुन जप्त करण्यात आली. संशयीत आरोपीताकडुन नंदुरबार जिल्हयातील मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणून अधिक विचारपुस केली असता, त्याने मागील दोन वर्षाच्या काळात नंदुरबार शहरातील कोकणी हिल, माळी वाडा, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, जायखेडा, धुळे जिल्ह्यातील साक्री शहर तसेच साक्री तालुक्यातील म्हसदी, देऊर, धाडणे, मालपूर, कासारे, शेवाळी, पिंपळनेर, दहिवेल येथे रात्रीच्या वेळी बंद घरांचे कुलुप लोखंडी टॅमीने तोडून चोरी केले बाबत सविस्तर माहिती दिली. नंदुरबार शहरात कोणत्या ठिकाणी घरफोडी केली आहे याची खात्री व्हावी याकरीता संशयीत विजय रमेश दाभाडे यास खाजगी वाहनाने तो सांगत असलेल्या ठिकाणी माळी वाड्यात घेवून गेलो असता दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी सदर ठिकाणी घरफोडी झाल्याची माहिती मिळाली. त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 872/2021 भा.दं.वि. कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयीत विजय दाभाडे याने नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, जायखेडा, धुळे जिल्ह्यातील साक्री शहर तसेच साक्री तालुक्यातील म्हसदी, देऊर, धाडणे, मालपूर, कासारे, शेवाळी, पिंपळनेर, दहिवेल येथे रात्रीच्या वेळी बंद घरांचे कुलुप लोखंडी टॅमीने तोडून चोरी केले बाबत सविस्तर माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून नंदुरबार जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्द्चे 02 व नाशिक जिल्ह्यातील 02 व धुळे जिल्ह्यातील 10 असे एकुण 14 मालमत्तेविरुध्द्चे गंभीर गुन्हे उघडकीस आणून 63,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदर कामगिरी करणाऱ्या पथकाचे पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच संशयीत आरोपी विजय दाभाडे याचेवर यापूर्वी देखील धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री, निजामपूर येथे 06 मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे दाखल असून त्याचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी यावेळी सांगितले. ही कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार विनोद जाधव, महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक दादाभाई मासुळ, जितेंद्र ठाकुर, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, आनंदा मराठे, अभिमन्यु गावीत यांच्या पथकाने केली आहे.
Users Today : 23