अल्पवयीन मुलीच्या विवाह मंडपात पोहचली शहादा पोलिसांची वरात !

Khozmaster
4 Min Read

प्रविण चव्हाण

नंदुरबार : जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्हयात राबविण्यात येत आहे. बुपकरी ता. शहादा येथे होणारा बालविवाह थांबविण्यास शहादा पोलीसांना व अक्षता सेलला यश आले आहे.

बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाय योजना करणे या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दला तर्फे सुरु करण्यात आला आहे.

दिनांक 21 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की, शहादा तालुक्यातील बुपकरी येथील एका अल्पवयीन मुलीचा डांबरखेडा ता. शहादा येथील एका मुला सोबत दिनांक 22 एप्रिल रोजी बालविवाह होणार असुन आज रोजी हळदीचा कार्यक्रम सुरु आहे अशी माहिती मिळाली.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदरची माहिती शहादा पोलीस सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना कळवून पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती मार्फत सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणे बाबत आदेशीत केले.

शहादा पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी पोलीस ठाणे स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीचे सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता बुपकरी येथे एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असल्याचे दिसून आले. म्हणून अक्षता समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या मुलाच्या व मुलीच्या नातेवाईकांना त्यांच्या जन्म तारखे बाबत विचारपूस करुन आधार कार्डची मागणी केली. आधार कार्डची पाहणी केल्यानंतर सदरची अल्पवयीन मुलगी 14 वर्षे व मुलाचे वय 24 वर्षे वयाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अक्षता समितीने अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना शहादा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदर ची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावी पणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समुळ उच्चाटन करण्यात यश येईल असे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

“ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात करण्यात आला असून आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 471 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आला आहे. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील.

सदर ची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरेे यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस उप निरीक्षक जितेंद्र पाटील, संरक्षण अधिकारी गौतम वाघ, क्षेत्रीय कार्यकर्ते संतोष निकम, बुपकरी गावाचे पोलीस पाटील दिपक पवार, डांबरखेडा येथील पोलीस पाटील सखाराम शिंदे यांनी संयुक्तीक पणे केली आहे.

 

पालकांनी अल्पवयीन मुलगी किंवा मुलगा यांचा बालविवाह न करता त्यांना उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांचा विवाह करावा. बालविवाहामुळे महिलांवर अनेक दुष्परिणाम होतात.

बालविवाह करणाऱ्या पालकांना तसेच विवाहात हजर असलेल्या नातेवाईकांना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात. तसेच आपल्या परिसरात होणाऱ्या बालविवाहा बाबत अक्षता समितीचे सदस्य पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंणवाडी सेविका किंवा बीट अंमलदार यांना सूचीत करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.-पी.आर.पाटील,पोलीस अधीक्षक, नंदुरबार

0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *