ऐतिहासिक भवानी माता मंदिर पहूरकरांचे श्रद्धास्थान

Khozmaster
2 Min Read

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

वाघुर नदीच्या तीरावर वसलेल्या भवानी मातेने दरोडेखोरांना आंधळे केल्याची आख्यायिका !

 

पहूर , ता . जामनेर÷ ( शंकर भामेरे ) वाघुर नदीच्या तीरावर पहूर कसबे गावाच्या दक्षिणेला वसलेले जय भवानी मातेचे जागृत देवस्थान पहूर गावाचा ऐतिहासिक ठेवा असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे . पूर्वीच्या काळी दरोडेखोरांपासून देवी मातेने गावाचे संरक्षण करून दरोडेखोरांना आंधळे केल्याची आख्यायिका सांगितली जाते . आज अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून सुरू झालेल्या अश्विन नवरात्री उत्सवानिमित्त मंदिर विद्युत रोषणाईने सजले आहे .

पहूर कसबे प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर वाघुर नदीच्या पलीकडे गोमुख कुंडाजवळ हे जागृत देवस्थान आहे . सुमारे ३०० वर्षांपूर्वी पासून हे देवस्थान असल्याचे जाणकार सांगतात . मंदिराची उभारणी चुना आणि विटांपासून केली असून सुमारे तीन फूट रुंदीच्या जाड भिंती मंदिराच्या भक्कमतेची साक्ष देतात .

मंदिराच्या उत्तरेला दगड आणि चून्यात बांधलेले चौरसाकृती गोमुख जलकुंड आहे . आजही या गोमुखातून पावसाळ्यात पाणी वाहत असते . मात्र गावकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज गोमुखकुंड अखेरच्या घटका मोजत आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात व्याघ्रारुढ भवानी मातेची विलोभनीय मूर्ती विराजीत आहे .

पूर्वीच्या काळी येथे चैत्र नवरात्र उत्सवात यात्रा भरायची 

बारा गाड्या उत्सव व्हायचा .मात्र आज हे उत्सव बंद पडले आहेत .गेल्या ३१ वर्षांपासून येथे घटस्थापना व नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे . लोकवर्गणीतून मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे .मंदिरासमोर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे .

पूर्वी मंदिराजवळ कवठाचे झाड होते 

२००५ मध्ये महादेवाची पिंड आणि नंदीच्या पुरातन मूर्ती विसर्जित करून नवीन मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली . विनायक बावस्कर , सुधाकर चौधरी , अशोक बावस्कर ,अनिल पाटील , अमोल बावस्कर , गोपाल बावस्कर , सचिन बावस्कर , उमेश बावस्कर यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे मंदिर विकासकामी सहकार्य मिळत आहे . नवसाला पावणारी जय भवानी माता पहुरकरांचे श्रद्धास्थान बनले आहे . नऊ दिवस मोठ्या भक्ती भावात भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात . देवीला खणा -नारळाची ओटी अर्पण करतात .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *