छत्रपती संभाजीनगर :-
राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर असताना उमेदवारीच्या मुद्द्यावरून विविध पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या काही इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळाला.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. मात्र अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने काही कार्यकर्ते आक्रमक झाले. काहींनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी आत्मदहनाचा इशाराही दिला. नाराज कार्यकर्त्यांनी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या वाहनालाही घेराव घातल्याची घटना घडली.
भाजप कार्यालयात भावनिक वातावरण
शहरातील भाजप कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडत आपला रोष व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. कार्यालय परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
संजय केनेकरांनी काढली समजूत
कार्यकर्त्यांची स्थिती लक्षात घेत आमदार संजय केनेकर यांनी अचानक भाजप कार्यालयात उपस्थित राहून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते प्रशांत भदाणे यांचा भावनिक उद्रेक पाहून केनेकर स्वतःही भावूक झाले. त्यांनी भदाणे यांना गळ्याशी धरून धीर दिला आणि त्यांचे अश्रू पुसले.
भदाणे यांनी,
“मी कुठे कमी पडलो साहेब? मी कुठे कमी पडलो?”
असा आक्रोश करत आपली व्यथा मांडली.
त्यावर संजय केनेकर यांनी,
“मी आहे ना, न्याय देतो. संयम ठेवा,”
असे म्हणत त्यांची समजूत काढली.
“सर्वांनाच एकाच वेळी न्याय देणं शक्य नाही”
यानंतर संजय केनेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत असतात. साहजिकच उमेदवारी न मिळाल्यावर नाराजी व्यक्त होते. मात्र पक्षाला एकाच वेळी सर्वांना न्याय देणे शक्य नसते. अशा वेळी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.”
दहा वर्षांहून अधिक काळ अनेक कार्यकर्ते निष्ठेने पक्षासाठी कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पक्षासमोर समेटाचे आव्हान
तिकीट वाटपानंतर निर्माण झालेल्या असंतोषामुळे भाजप नेतृत्वासमोर नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. येत्या काळात पक्ष या नाराजीवर कसा तोडगा काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 11