बुलढाणा, दि. ९ (प्रतिनिधी) :
अनुसूचित जमातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. शिष्यवृत्तीत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निवास व भोजन खर्च, शैक्षणिक साहित्य, विमा, विमान प्रवास आणि इतर आवश्यक खर्च यांचा समावेश आहे. एका विद्यार्थ्यासाठी कमाल ५० लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार असून, दरवर्षी एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अटी :
-
परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश असणे आवश्यक.
-
तत्सम आंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक.
-
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्ज प्रक्रिया :
सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, परदेशी विद्यापीठाचे प्रवेशपत्र, पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
आदिवासी विकास विभागाचे आयुक्त व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने सांगितले आहे की ही योजना अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
Users Today : 6