इराण–अमेरिका–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. वाढत्या तणावामुळे घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची, तर १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवाढीमुळे हॉटेल, ढाबे आणि खाद्य व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी बाहेर खाणे-पिणेही महाग होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर दरवाढ सामान्य कुटुंबांच्या बजेटवर मोठा ताण आणणारी ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
काही महिलांनी संताप व्यक्त करत “गॅस सिलिंडरची दरवाढ आम्हाला परवडणारी नाही. घरखर्चाचे गणित कोलमडले आहे. आता आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचा का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी बुकिंगसाठी धाव घेतली. Kalyan–Dombivli परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गॅस बुकिंग करण्यास सुरुवात केली. मात्र गॅस वितरण संघटनांनी स्पष्ट केले आहे की घरगुती LPG सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही आणि घरपोच पुरवठा सुरळीत सुरू आहे.
तथापि, युद्धस्थिती लक्षात घेता दोन सिलिंडर बुकिंगमधील कालावधी १५ दिवसांवरून २१ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या नियमामुळे काही कुटुंबांना अडचणी येत असल्याचे गॅस एजन्सीकडून सांगण्यात आले असून या नियमात सवलत देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान Nagpur येथे गो गॅस पंपावर LPG भरण्यासाठी ऑटोचालकांची मोठी गर्दी दिसून आली. मर्यादित पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गॅस वितरण संघटनांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
Users Today : 34