नागपूर प्रतिनिधी –
युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे गॅस एजन्सी आणि गोदामांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान केंद्र सरकारने दोन सिलिंडरच्या बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर अनिवार्य केल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक ग्राहक सिलिंडर मिळवण्यासाठी एजन्सीकडे धाव घेत आहेत.
युद्धापूर्वी नागपुरात दररोज सुमारे ३५ हजारांहून अधिक घरगुती गॅस सिलिंडरची विक्री होत होती. मात्र सुरुवातीला हॉटेल व्यावसायिक आणि टपरीधारकांनी गोदामांबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सामान्य ग्राहकांमध्येही भीती निर्माण झाली. परिणामी अनेक नागरिकांनीही सिलिंडर मिळवण्यासाठी एजन्सीकडे गर्दी केली.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी बुकिंग सॉफ्टवेअरमध्ये बदल करत दोन बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर बंधनकारक केले आहे. त्यामुळे पहिल्या सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्याशिवाय दुसरे बुकिंग करता येत नाही.
घरात भरलेले सिलिंडर असतानाही पुढे गॅस मिळेल की नाही, या भीतीने अनेक ग्राहक मुदत पूर्ण होण्यापूर्वीच बुकिंगसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र सॉफ्टवेअरमधील २५ दिवसांच्या नियमामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
Users Today : 11