अमरावती राममय; श्रीरामनवमी उत्सवात शहरात भक्तीमय वातावरण

KHOZ MASTER
2 Min Read

अमरावती :

श्रीरामनवमी अर्थात रामजन्मोत्सवानिमित्त गुरुवार, २५ मार्च रोजी अमरावती जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रखरखत्या उन्हासह पेट्रोलच्या टंचाईचा काही प्रमाणात परिणाम जाणवत असला, तरी अंबानगरी पूर्णपणे राममय झाल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळी जयस्तंभ चौकात शहरातील विविध भागांतून आलेल्या शोभायात्रा एकत्र आल्याने परिसराला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते.

‘राम जन्मला गं संखी…’, ‘रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील…’, ‘मेरी झोपडी के भाग आज खुल जाएंगे…’ यांसारख्या भक्तीगीतांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. श्रीरामनवमीच्या निमित्ताने जिल्हाभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बडनेरा येथील राम मंदिर, रायली प्लॉट, अंबापेठ, जवाहरगेट येथील प्राचीन मंदिरांसह अंबादेवी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

### शहराला प्राचीन मंदिरांचा वारसा

अमरावती शहराला प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अंबापेठ येथील श्रीराम मंदिराला २०० वर्षांहून अधिक इतिहास असून १८२१ मध्ये चिंतामणशास्त्री बेडेकर यांनी येथे प्रथम पौराहित्य केल्याची नोंद आहे. मंदिराचा आतील भाग जुन्या वाड्याच्या शैलीत बांधलेला असून आजही तो जतन करून ठेवण्यात आला आहे.

याशिवाय सराफा बाजारातील काळाराम मंदिर आणि दहीसाथ येथील राम मंदिर देखील प्राचीन मानले जातात. त्यामुळे रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच या मंदिरांमध्ये रामभक्तांची मोठी उपस्थिती दिसून आली.

दरम्यान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू दुर्गावाहिनी तसेच शिवसेना यांसह विविध संघटनांकडून रामनवमी निमित्त रॅली काढण्यात आली. स्थानक चौकातील उड्डाणपूल बंद असल्यामुळे शोभायात्रांचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले होते.

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या शोभायात्रेत सुमारे १२ फूट उंच वराहदेवतेची प्रतिमा विशेष आकर्षण ठरली. तसेच मारुतीरायाच्या भव्य मूर्तींसह विविध झांकींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

एकंदरीत रामनवमीच्या उत्सवामुळे अमरावती शहरात दिवसभर भक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *