वाशीम :
महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी मानली जाणारी ‘एचपीव्ही’ लस आता सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींसाठी शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांत हजारो रुपयांना मिळणारी ही महागडी लस वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विनामूल्य दिली जात आहे.
बाजारात ‘गार्डासिल’सारख्या नामांकित कंपन्यांच्या एचपीव्ही लसींची किंमत सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असते. त्यामुळे ही दरी भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ही लस सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध करून दिली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांच्या मृत्यूचे एक मोठे कारण मानले जाते. वेळेवर घेतलेली एचपीव्ही लस हा भविष्यातील जीवघेणा धोका टाळण्यास मदत करू शकते. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
‘एचपीव्ही’ लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती
सरकारी दवाखान्यांमध्ये १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षांखालील मुलींसाठी ही लसीकरण योजना राबविण्यात येत आहे. वाशीम जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस पूर्णपणे मोफत दिली जात आहे.
“मुलींना लसीकरण करून कर्करोगमुक्त करा”
या लसीकरणाचे महत्त्व सांगताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी एक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी ही लस शासकीय स्तरावर उपलब्ध नव्हती. त्यावेळी आपल्या मुलीच्या भविष्यातील आरोग्याची काळजी म्हणून त्यांनी खासगी बाजारातून ही महागडी लस विकत घेतली होती. मात्र आता हीच दर्जेदार लस शासनामार्फत मोफत उपलब्ध होत आहे.
ही लस पूर्णपणे सुरक्षित असून तिचे गंभीर दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे पालकांनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या मुलींचे लसीकरण करून त्यांना कर्करोगमुक्त भवितव्याची अमूल्य भेट द्यावी, असे आवाहन डॉ. कावरखे यांनी केले आहे.
Users Today : 39