एसपी संधू यांच्या आदेशानंतर जाफ्राबाद पोलिसांची कारवाई; वाळू माफियांचा माज उतरवला

KHOZ MASTER
2 Min Read

जालना –

देऊळझरी (ता. जाफ्राबाद) येथील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावर पोलिसांनाच खुले आव्हान देणाऱ्या आरोपीविरुद्ध जाफ्राबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू यांच्या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित वाळू माफियांवर कठोर कारवाई केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास राणुबा बकाल आणि त्याचा भाऊ परमेश्वर बकाल यांच्याविरुद्ध दि. १६ एप्रिल रोजी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान दोघांचा जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आला होता.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार दि. ५ मे रोजी पोलिसांनी जप्त केलेला जेसीबी सोडून दिल्यानंतर आरोपी कैलास बकाल याने पोलीस ठाण्याच्या आवारातून फटाके फोडत व्हिडिओ तयार केला. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे पोलिस कारवाईविरोधात आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक मजकूर प्रसारित करत पोलिस प्रशासनालाच खुले आव्हान दिल्याचे समोर आले.

या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू तसेच भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी तातडीने कारवाई केली. आरोपी कैलास बकाल याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून माफी मागून घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार पठाडे करीत आहेत. अवैध वाळू उत्खनन आणि प्रशासनाविरोधातील प्रक्षोभक कृत्ये सहन केली जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिस प्रशासनाने दिला आहे.

0 9 7 0 7 4
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *