पोटच्या मुलीचा बापानेच केला खून; भावाच्या मदतीने प्रेताची विल्हेवाट

KHOZ MASTER
3 Min Read

बुलढाणा जिल्हा 

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात स्वतः जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या करून भावाच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चारित्र्याच्या संशयातून आणि प्रेमसंबंधांना विरोध म्हणून ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी राजुरा शिवारातील एका शेतात एका महिलेचे मुंडके नसलेले आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. काही अंतरावर मानवी कवटीही सापडली होती. या घटनेनंतर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील विविध भागात समांतर तपास सुरू केला.

सलग १२ दिवसांच्या तपासानंतर मध्यप्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात शिवानी बापुराम कलमेकर नावाच्या महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून तिचे वडील बापूराम नथ्थु कलमेकर (वय ५५) आणि भाऊ अजय बापूराम कलमेकर (वय २७, रा. खडकी, जि. बुरहानपूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक शिवानीचा विवाह १५ एप्रिल २०२६ रोजी धारणी येथील एका युवकासोबत झाला होता. मात्र तिचे चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय कुटुंबीयांना होता. लग्नानंतरही ती ऐकत नसल्याच्या रागातून २३ एप्रिलच्या रात्री वडील बापूराम यांनी बांबूने डोक्यावर वार करून तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला. त्यानंतर बाप-लेकाने मोटारसायकलवरून मृतदेह राजुरा शिवारात आणला. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके वेगळे करण्यात आले तसेच प्रेत जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी कपडे व हत्यारे जंगलात फेकून देण्यात आली. गुन्हा लपवण्यासाठी मुलगी घर सोडून गेल्याची खोटी तक्रारही खकनार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0 9 7 0 7 4
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *