*मेहकर
तालुक्यातील गौढाळा येथे शेतकरी श्रीकिसन शिकारे यांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत गोठ्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत केली.
बुधवारी (दि. १३) दुपारी सुमारे दोन वाजताच्या दरम्यान शिकारे यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण गोठा आपल्या विळख्यात घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या दुर्घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मेहकर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही जिवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी सहकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगीत गोठ्यातील पत्रे, स्प्रिंकलर पाइप, सोयाबीनची पोती, गुरांचे कुटार तसेच अन्य शेती साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. प्राथमिक पंचनाम्यानुसार सुमारे ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष किशोर गारोळे, नगरसेवक महेश रिंढे, नगरसेवक सतीश ताजने, अॅड. आकाश घोडे तसेच निसार यांनी घटनास्थळी भेट देत शेतकरी कुटुंबाची विचारपूस केली. यावेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी श्रीकिसन शिकारे यांना १० हजार रुपयांची नगद मदत दिली, तर नगरसेवक महेश रिंढे आणि सतीश ताजने यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली.
Users Today : 23