नाशिक
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने पोलीस दलातील सुमारे ४० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यामध्ये कराळे यांच्या नावाचा समावेश आहे.
या निर्णयानुसार नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशोक खरात या कथित भोंदूबाबाच्या प्रकरणात त्याचे राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळातील संपर्क असल्याच्या चर्चा राज्यभर रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही छायाचित्रे आणि व्हिडीओ सार्वजनिक करत दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संबंधित व्हिडीओमध्ये कराळे हे खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचे आणि त्यांनी मंचावर भाषण दिल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता.
तसेच दोघांमध्ये अनेक वेळा दूरध्वनीवरून संपर्क झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर शासनाने प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया यांनी समाधान व्यक्त केले असले तरी केवळ बदली पुरेशी नसून कठोर कारवाई, तसेच निलंबनाची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, या मोठ्या प्रशासकीय फेरबदलात नाशिक एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुणे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी, तर कृष्ण प्रकाश यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह लखमी गौतम, मनोज शर्मा, सुवेझ हक, संजय दराडे यांसारख्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत.
प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांमुळे पारदर्शक चौकशीची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Users Today : 24