Employees’ Provident Fund Organisation अर्थात EPFO कडून देशातील कोट्यवधी नोकरदार आणि निवृत्तीधारकांसाठी मोठे बदल करण्याची तयारी सुरू असून, किमान पेन्शन वाढ आणि ATM-आधारित PF विथड्रॉल सुविधा यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. EPFO 3.0 अंतर्गत संपूर्ण प्रणाली अधिक डिजिटल आणि वेगवान करण्यावर भर दिला जात आहे.
सध्या EPS-95 अंतर्गत निवृत्तीधारकांना किमान 1000 रुपये पेन्शन मिळते. मात्र, ती वाढवून 3000 रुपये करण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. काही कर्मचारी संघटनांनी ही रक्कम थेट 7500 रुपये करण्याची मागणी देखील केली आहे. तथापि, यासंदर्भात केंद्र सरकार किंवा EPFO कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
EPFO 3.0 अंतर्गत PF संबंधित सर्व प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल करण्याची तयारी सुरू आहे. क्लेम सेटलमेंट, PF ट्रान्सफर आणि खात्याशी संबंधित सेवा ऑनलाइन आणि ऑटोमेटेड पद्धतीने उपलब्ध करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचण्यासोबतच कार्यालयीन प्रक्रिया जलद होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, भविष्यात सदस्यांना विशेष ATM कार्ड देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सुविधेमुळे कर्मचारी ATM मधून थेट PF रक्कम काढू शकतील. तसेच EPFO प्रणाली UPI आणि डिजिटल बँकिंगशी जोडण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे PF क्लेमची रक्कम अधिक जलद खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे.
Google Pay किंवा PhonePe सारख्या ॲप्समधून PF रक्कम थेट काढता येणार का, याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
EPFO कडून सुरू असलेल्या या डिजिटल बदलांमुळे देशातील 7 कोटींहून अधिक सदस्यांना भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पेन्शन वाढ आणि ATM सुविधेबाबत अंतिम निर्णय अधिकृत अधिसूचीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Users Today : 29