बीड
देशभर गाजलेल्या NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरसीसी (RCC) कोचिंग सेंटरचे संचालक असलेल्या मोटेगावकर यांना परीक्षा होण्याच्या तब्बल १० दिवस आधी म्हणजेच २३ एप्रिल रोजीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
पेपरफुटीच्या आरोपांमुळे तपासाला वेग
मिळालेल्या माहितीनुसार, NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात अनेक संशयितांची चौकशी सुरू असून काही ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत शिवराज मोटेगावकर यांचे नाव पुढे आल्याने बीडसह राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे.
मोटेगावकर हे लातूर पॅटर्नच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती समोर येत असून, आता या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पालकांमध्ये संतापाचे वातावरण
या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले असून “जर परीक्षा प्रक्रियाच सुरक्षित नसेल, तर विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून काय उपयोग?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना लातूर, बीड आणि इतर शहरांमध्ये कोचिंगसाठी पाठवणाऱ्या पालकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू
पेपरफुटी प्रकरणात आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिकेची गळती आणि संबंधित नेटवर्कची माहिती मिळवण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध दावे केले जात असले तरी अधिकृतरीत्या तपास पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही अंतिम माहिती देण्यात आलेली नाही.
शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पेपरफुटी थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.
Users Today : 32