मेहकर
मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, मेहकर व लोणारचे तहसीलदार, कृषी अधिकारी तसेच पेट्रोल पंप मालक उपस्थित होते. बैठकीत शेतकरी बांधवांना टँकरद्वारे पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्याबाबत तोंडी आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसून येत आहे.
आजही अनेक शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहताना दिसत आहेत. काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या दोन-दोन किलो मीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस इंधनासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीची कामे ऐन हंगामात सुरू असताना प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे बैठकीत कॅन द्वारे इंधन पुरवन्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला गेला, परंतु प्रत्यक्षात ना सुधारणा दिसत आहेत ना कोणती प्रभावी यंत्रणा. त्यामुळे “बैठक झाली फक्त फोटोसाठी आणि प्रसिद्धीसाठी का?” असा सवाल आता शेतकरीच नव्हे तर पेट्रोल पंप चालक देखील उपस्थित करत आहेत.
पेट्रोल पंप मालकांमध्ये देखील नाराजीचे वातावरण असून, “फक्त तोंडी आदेश देऊन प्रशासनाने जबाबदारी झटकली. कोणतीही लेखी सूचना किंवा स्पष्ट नियोजन नसल्याने सर्व भार पंप चालकांवर पडत आहे,” अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळातही या प्रकारावरून टोलेबाजी सुरू झाली आहे. विरोधकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत, “बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत; जमिनीवर उपाययोजना दिसल्या पाहिजेत,” असा घणाघात केला आहे.
शेतकरी मात्र अजूनही एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत —
बैठकीत दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कधी उतरणार, की हा सगळा प्रकार केवळ एक ‘फार्स’ ठरणार?
