नगरपरिषदेच्या वतीने या व्यापारी संकुलातील गाळेधारक व नागरिकांच्या सुविधेसाठी शौचालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हे शौचालय हनुमान मंदिरापासून अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर, तसेच रहिवासी वस्ती आणि दोन खासगी दवाखान्यांच्या शेजारी असल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रस्तावित ठिकाणामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास होऊन रहिवाशांचे दैनंदिन जीवन बाधित होईल. विशेषतः महिला, लहान मुले, गरोदर महिला आणि रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागेल, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मंदिराजवळ शौचालय बांधल्याने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी नगरपरिषदेला पर्यायी जागेवर, विशेषतः पाटबंधारे विभागाजवळ शौचालय बांधण्याची मागणी केली आहे, जेणेकरून व्यापारी संकुलातील दुकानदार व ग्राहकांची सोयही होईल आणि वस्तीवर परिणाम होणार नाही.
या निवेदनावर ज्ञानेश्वर आव्हाळे, प्रदीप ईलग, दत्तात्रय देशपांडे, विष्णू बोरे, अजय खिल्लारे, हरिओम चनखोरे यांच्यासह ५४ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
