पूर्णा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू पातोंडा शिवारातील दुर्दैवी घटना; आलमपूर गावावर शोककळा

KHOZ MASTER
2 Min Read

*निमगाव, ता. नांदुरा प्रतिनिधी*
पूर्णा नदीपात्रातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ मे रोजी पातोंडा शिवारात घडली. तुषार रामदास तायडे (वय २३, रा. आलमपूर, ता. नांदुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मृताचा चुलतभाऊ ऋषीकेश संतोष तायडे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, तुषार तायडे हा नांदुरा येथील कोठारी कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता. पातोंडा शिवारातील उमेश कुवारे यांच्या शेतातील गोठ्यावर त्याच्या गायी ठेवण्यात येत होत्या. उमेश कुवारे यांच्या बकऱ्यांसोबतच तुषारच्या गायीही चारल्या जात होत्या.

तुषार हा दररोज गायींना पाणी पाजण्यासाठी गोठ्यावर जात असे. गुरुवारी त्याची गाय पूर्णा नदीपात्राकडे गेल्याने तिला हाकलण्यासाठी तो नदीकाठावर गेला असता त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडून बुडाला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुराचे उपसभापती पुरुषोत्तम झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मोरे, किशोर नेमाडे, लहू नेमाडे, कैलास झाल्टे, ओमसाई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, आदित्य इंगळे यांच्यासह अनेकांनी मदतकार्य केले.

मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनानंतर आलमपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तुषार हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील व बहीण असा परिवार आहे.

या प्रकरणी कोणाविरुद्धही संशय व्यक्त करण्यात आलेला नसून नांदुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. सोळंके करीत आहेत.

0 9 7 4 7 3
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *