बस चालकाच्या प्रसंगावधानाने २० प्रवाशांचे प्राण वाचले ## सिंदखेडराजाजवळ भीषण अपघात टळला

KHOZ MASTER
2 Min Read

सिंदखेडराजा 
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथून देऊळगाव कोळकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक मोती तलावाजवळ भीषण अपघात होता होता टळला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याखाली गेली होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस पुलाच्या कठड्यावर अडकली आणि नाल्यात कोसळण्यापासून बचावली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

एमएच-१४ बीटी-४१९४ क्रमांकाची एसटी बस गुरुवारी रात्री सुमारे १० वाजता पिंपरी-चिंचवडहून २० प्रवासी घेऊन देऊळगाव कोळकडे जात होती. सिंदखेडराजा येथील मोती तलावाजवळील धोकादायक वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचवताना चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली.

रस्त्यालगत मोठा नाला असल्याने बस थेट नाल्यात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालक गणेश धोटे यांनी प्रसंगावधान राखत बसवरील नियंत्रण कायम ठेवले. त्यामुळे बस नाल्यात न जाता पुलाच्या कठड्याला अडकली आणि मोठा अनर्थ टळला.

अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विजय तायडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच एसटी महामंडळाचे सिंदखेडराजा येथील नियंत्रक चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली.

पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. चालक गणेश धोटे आणि वाहक राहुल कोरडे यांच्या मदतीने नाल्याच्या काठावर अडकलेली बस बाहेर काढण्यासाठी क्रेन व इतर यंत्रसामग्रीची मदत घेण्यात येत आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी झालेला हा अपघात अत्यंत भीषण ठरू शकला असता. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे २० प्रवाशांचे प्राण वाचल्याने सर्वत्र चालक गणेश धोटे यांचे कौतुक होत आहे.

0 9 7 4 7 3
Users Today : 52
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *