मुंबई :-
खारमधील एका व्यावसायिक खंडणीकरिता मारहाण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांना गेल्या वर्षी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महेश पाटील यांच्यावर एक महिना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली होती. तसेच महिनाभराने कामावर रुजू झाल्यानंतर महेश पाटील यांची बीएमसीच्या के – नॉर्थ वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसर (मुंबई महापालिका सहाय्यक आयुक्त) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता वादग्रस्त महेश पाटील यांच्यावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी यांची पत्नी हबीबा जाफरी यांनी 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आठवडाभरापूर्वीच आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता महेश पाटील गायब असल्याची माहिती समोर येत आहे.*
*हबीबा जाफरी यांनी 13 मे रोजी रात्री 09.30 वाजताच्या सुमारास महेश पाटील यांच्यावर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.*
*हबीबा यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी महेश पाटील यांच्या व्यतिरिक्त निशीत पटेल (2025 मध्ये ज्या व्यावसायिकाने पाटील यांच्यावर आरोप केला होता, तेच हे व्यावसायिक), रूपेश, सागर मेहता, देवेंद्र पडवळ आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य आणि त्यात गुंतलेली मोठी रक्कम लक्षात घेता, तपास आता मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात निशित पटेलच्या कोठडीत 19 मे रोजी वाढ करण्यात आली आहे. मात्र हबीबा जाफरी यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच महेश पाटील गायब झाले आहेत. त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलसह इतर वेगवेगळ्या पथकांकडून महेश पाटील यांचा शोध घेण्यात येत आहे.*
*हबीबा जाफरी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या सांगण्यावरून आणि आश्वासनांवरून त्यांनी एका पुनर्विकास प्रकल्पात मोठी रक्कम गुंतवली होती. परंतु, मोठी रक्कम गंतवणूक करून ही महेश पाटील यांनी हबीबा यांना ना घर दिले, ना त्यांची गुंतवणूक परत केली. ज्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी महेश पाटील आणि निशित पटेल यांच्या व्यतिरिक्त, रुपेश, सागर मेहता, देवेंद्र पडवळ आणि इतर सहभागी लोकांना सहआरोपी करत गुन्हे दाखल केले आहेत. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, या आरोपींनी वांद्रे पश्चिम येथील पुनर्विकास प्रकल्पात मोठ्या नफ्याचे आश्वासन देऊन अनेक प्रतिष्ठित गुंतवणूकदारांना आमिष दाखवले होते.*
*सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ जाफरी कुटुंबच नाही, तर निवृत्त पोलीस अधिकारी, बीएमसी अधिकारी, कलाकार आणि निवृत्त न्यायाधीश यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनीही या प्रकल्पात 50 लाख ते 20 कोटी रुपयांपर्यंतची मोठी रक्कम गुंतवली आहे. हबीबा जाफरी यांनी त्यांच्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, बीएमसी कार्यालयात गेल्यावर त्यांना या योजनेबद्दल पहिल्यांदा समजले. तिथे त्यांची महेश पाटील यांच्याशी भेट झाली, ज्यांनी त्यांना गुंतवणूक योजनेबद्दल माहिती दिली आणि गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. महेश पाटील यांनी निशित पटेल यांच्यामार्फत त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला.*
Users Today : 0