गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा पारंपरिकरित्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून, या मतदारसंघातून युवासेनेचे महाराष्ट्र सचिव अभिमन्यूदादा खोतकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश गणगे पाटील यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात योगेश गणगे पाटील यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या माध्यमातून मराठवाड्यात युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी अभिमन्यूदादा खोतकर यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक युवक पक्षाशी जोडले गेले आहेत.
राजकीय कार्यासोबतच अभिमन्यूदादा खोतकर यांनी सामाजिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या समस्या यांची त्यांना जवळून जाण असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार आणि शेतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहिमा राबवत युवा पिढीत जागरूकता निर्माण केली आहे. तसेच धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असून, विविध पदयात्रांमध्ये भाविकांसाठी अन्नदान, वैद्यकीय मदत आणि आवश्यक सुविधांचे आयोजन करण्यात त्यांनी योगदान दिले आहे.
युवासेनेचे सचिव म्हणून मराठवाड्यात युवकांचे संघटन बळकट करण्याबरोबरच त्यांना व्यसनमुक्ती, क्रीडा आणि सामाजिक कार्याकडे वळविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीही त्यांनी अनेक शिबिरे आयोजित केली आहेत. आरोग्य क्षेत्रातही गरीब रुग्णांना उपचारासाठी आर्थिक व प्रशासकीय मदत मिळवून देण्यात ते अग्रेसर राहिले आहेत.
विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात मराठवाड्याचा दमदार आवाज पोहोचवण्यासाठी तसेच युवक, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिमन्यूदादा खोतकर यांच्यासारख्या अभ्यासू, कार्यक्षम आणि तळागाळाशी नाळ जोडलेल्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक असल्याचे योगेश गणगे पाटील यांनी नमूद केले. मराठवाड्यातील युवकांच्या अपेक्षा आणि भावना लक्षात घेऊन शिवसेना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.