मलकापूर : नगर परिषद मलकापूर येथील दिव्यांग कर्मचारी अनंत उर्फ अनिल मनोहर चव्हाण यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी सौ. उज्वला अनंत उर्फ अनिल चव्हाण यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून पतीला तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
सादर निवेदनात तत्कालीन मुख्याधिकारी रमेश ढगे, आशिष बोबडे, प्रशांत शेळके, तत्कालीन आरोग्य निरीक्षक योगेश घुगे तसेच जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील गंगाधर पिंटे, न.प. उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी, कार्यालयीन अधीक्षक पूजा खरात आणि आरोग्य निरीक्षक अजय बैस यांचाही समावेश आहे.
निवेदनानुसार, अनंत उर्फ अनिल चव्हाण हे नगर परिषद मलकापूरच्या आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी रमेश ढगे व आशिष बोबडे यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गृह विभाग व नगर विकास विभागाकडून चौकशी सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांना वाचविण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता त्यांच्या पतीला निलंबित केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
“वरील अधिकारी व कर्मचारी हे माझ्या पतीचा कुठल्याही वेळी जीवघेणा घातपात करू शकतात. त्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे,” अशी मागणी सौ. उज्वला चव्हाण यांनी निवेदनातून केली आहे.
