शेगाव :* जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहर व तालुक्यातील सर्व पेट्रोलपंपांची प्रशासनाकडून संयुक्त पाहणी करण्यात आली. इंधनाचा सुरळीत पुरवठा कायम राहावा, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच साठेबाजीला आळा बसावा या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.
या संयुक्त पाहणी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक निमिष कुमार मेहेत्रे, पीएसआय गावंडे, निरीक्षण अधिकारी संतोष बावणे तसेच पुरवठा निरीक्षक किशन केणे यांचा समावेश होता. पथकाने शहरासह तालुक्यातील विविध पेट्रोलपंपांना भेट देऊन तेथील पेट्रोल व डिझेल साठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी संबंधित पेट्रोलपंप चालक व मालकांशी चर्चा करून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले.
शेती हंगाम लक्षात घेऊन शेतकरी वर्गाला प्राधान्याने पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित पेट्रोलपंप चालकांना सूचित करण्यात आले.
तसेच इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी संबंधित गावांतील पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्तरीय यंत्रणांनी प्रशासनास वेळोवेळी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठेही अवैधरित्या इंधन साठवणूक, कृत्रिम टंचाई किंवा नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे आढळल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत सांगितले की, “पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. भीतीपोटी नागरिकांनी अनावश्यक खरेदी किंवा साठेबाजी करू नये. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे.”
Users Today : 30