मेहकर :* शहरातील रामनगरजवळील डी.पी. रोडवरील लक्ष्मीनारायण नगर परिसरात शनिवारी पहाटे चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात मेहकर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. चोरट्यांनी दुचाकीसह सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पलायन केले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी परिसरातील दोन घरांचे कुलूप तोडले होते आणि ते तिसऱ्या घराचे कुलूप तोडण्याच्या तयारीत होते. दरम्यान, जागरूक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन घटनास्थळी दाखल झाले. वाहनात पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण गवई आणि चालक पोलीस कर्मचारी शिवाजी चिम हे तैनात होते.
पोलिसांचे वाहन वसाहतीत पोहोचताच एक संशयित चोरटा खाली उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच तो इमारतीच्या पायऱ्यांकडे पळाला. त्याचा पाठलाग करत असताना वरच्या मजल्यावरून त्याचे आणखी दोन साथीदार खाली आले आणि त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला.
या झटापटीदरम्यान चोरट्यांनी हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण गवई यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. तसेच डोक्यालाही जबर मार लागला आहे.
त्याचवेळी चालक शिवाजी चिम यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी हाताने वार अडविल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
यानंतर चोरट्यांनी परिसरातील एका नागरिकाची मोटारसायकल चोरी करून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र घाईगडबडीत त्यांनी स्वतः आणलेली मोटारसायकल तेथेच सोडून दिली.
जखमी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी दीपक लिंगाळे आणि अजितसिंग टाक यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले.
तपासात आरोपींनी तीन तोळे चांदीचे दागिने तसेच हिरो पॅशन मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून चोरीतील मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
Users Today : 30