दोन रुपयांच्या तिकिटावर साडेसहा कोटींचा व्यवहार?

KHOZ MASTER
2 Min Read

शिवराज मोटेगावकरांनी बेकायदेशीररित्या आठ प्लॉट खरेदी केल्याची आरटीआयमधून धक्कादायक माहिती

लातूर प्रतिनिधी :
लातूर शहरातील उद्योग भवन परिसरातील तब्बल २७ एकर जागेच्या वादाला आता नवे वळण मिळाले असून, आरटीआय अंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार शिवराज मोटेगावकर यांनी साडेसहा कोटी रुपयांची मालमत्ता केवळ दोन रुपयांच्या रशीद तिकिटावर खरेदी केल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. या व्यवहारामुळे महसूल प्रशासन, नोंदणी विभाग आणि आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहितीनुसार, संबंधित जमीन आणि प्लॉट व्यवहार हे उद्योग भवन परिसरातील महत्त्वाच्या भागात झाले असून, शिवराज मोटेगावकर यांनी तब्बल आठ प्लॉट खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी लागणाऱ्या आर्थिक देवाणघेवाणीची स्पष्ट माहिती खरेदीपत्रात नमूद नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित मालमत्ता अनिल कुमार अग्रवाल यांच्याकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती आरटीआय दस्तावेजांतून समोर आली आहे.

लातूर शहराच्या मध्यवर्ती भागातील उद्योग भवन परिसर आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘ट्युशन एरिया’ म्हणून ओळखला जातो. NEET पेपरफुटी प्रकरणानंतर या भागाची पुन्हा राज्यभर चर्चा सुरू झाली. मात्र या भागातील वाद केवळ कोचिंग क्लासेसपुरता मर्यादित नसून, मूळतः औद्योगिक वापरासाठी राखीव असलेल्या तब्बल २७ एकर जागेच्या वापरबदल, मालकी आणि व्यवहारांशी संबंधित गंभीर प्रश्न पुढे येत आहेत. या जागेची बाजारमूल्य अंदाजे तीन हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.

आरटीआयमधून उघड झालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यवहारांमध्ये महसूल नियमांचे उल्लंघन झाले का, जमीन खरेदीसाठी प्रत्यक्ष रक्कम कशा पद्धतीने देण्यात आली, व्यवहार अधिकृत नोंदणीत का दिसत नाहीत, तसेच प्लॉट हस्तांतरण प्रक्रियेत कोणत्या अधिकाऱ्यांची भूमिका होती, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या या परिसरातील जमीन व्यवहारांची चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखा, महसूल विभाग आणि संबंधित तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणामुळे लातूरमधील बहुचर्चित उद्योग भवन परिसर पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला असून, पुढील काही दिवसांत या संदर्भात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *