देशातील सर्वात लांब उन्नत मार्गाला राज्य सरकारचा हिरवा कंदील
पुणे प्रतिनिधी :
पुणेकरांसह मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे-शिरूर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग (Elevated Corridor) प्रकल्पास मंजुरी दिली असून, या मार्गामुळे पुणे ते शिरूर प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत तब्बल ५३.४ किलोमीटर लांबीचा सहापदरी महामार्ग उभारण्यात येणार असून, त्यातील सुमारे ३५ किलोमीटर भाग हा उन्नत मार्ग स्वरूपात असणार आहे. त्यामुळे हा देशातील सर्वात लांब उन्नत मार्ग ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
येरवडा, खराडी, वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर आणि शिरूर या परिसरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. विशेषतः पुणे-अहिल्यानगर मार्गावरील वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नवीन उन्नत मार्गामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होऊन प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांकडे जाणारा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. त्यामुळे दळणवळणासह औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुमारे ७,३०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीपैकी ८० टक्के जमीन आधीच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर पुढील चार वर्षांत हा महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अधिक वेगाने जोडणारा हा प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
