अमरावती
शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्याचा बछडा आढळल्याने गुरुवारी सायंकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. लोकवस्तीच्या भागात बिबट्या शिरल्याची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
माहितीनुसार, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांचे चुलत भाऊ यांनी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास परिसरातील एका गोदामाजवळ बिबट्याचा बछडा फिरताना पाहिला. यानंतर परिसरात ही बातमी वेगाने पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तसेच गाडगेनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, महापौर श्रीचंद तेजवाणी आणि गटनेते चेतन गावंडे यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
रामपुरी कॅम्प परिसरातील शासकीय देशी दारू दुकानाच्या आवारात बिबट्याचा बछडा लपून बसल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या पथकाला बराच वेळ बछड्याने चकवा दिला. अखेर मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वन विभागाने बिबट्याच्या बछड्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात यश मिळविले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
