वर्धा नदीत पाच मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; मृत्यूपूर्वी काढलेली अखेरची सेल्फी ठरली आठवण

KHOZ MASTER
1 Min Read

 चंद्रपूर (घुग्गुस)

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरालगतच्या माथारदेवी परिसरात वर्धा नदीत बुडून पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत्यूपूर्वी पाचही मित्रांनी एकत्र काढलेली सेल्फी आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी अखेरची आठवण ठरली आहे.

मृत युवकांमध्ये सम्यक देवराव सोनटक्के, संनी अशोक आस्मपेल्ली, रोहित बाबाराव बोबडे, शिव भास्कर केलझरकर आणि तन्मय नवनाथ पथाडे यांचा समावेश आहे. हे सर्व युवक घुग्गुस येथील इंदिरा नगर परिसरातील रहिवासी असून मित्रमंडळीसह पोहण्यासाठी वर्धा नदीकाठी गेले होते.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत युवक घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शोधादरम्यान नदीकाठी त्यांचे कपडे व मोबाईल फोन आढळून आल्याने अनर्थाची भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत रात्रभर तसेच दुसऱ्या दिवशी दिवसभर शोधमोहीम राबविली. अथक प्रयत्नांनंतर पाचही युवकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले.

तपासादरम्यान नदीत उतरण्यापूर्वी पाचही मित्रांनी एकत्र सेल्फी काढल्याची बाब समोर आली. आनंदाच्या क्षणी काढलेला हा फोटो त्यांच्या जीवनातील अखेरचा क्षण ठरल्याने नातेवाईक आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुर्दैवी घटनेने घुग्गुस परिसर हादरला असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *