आष्टी (गडचिरोली)
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन युवक गंभीर जखमी झाले. मात्र, सुरुवातीला केवळ वाहतूक अपघात वाटणाऱ्या या घटनेत पोलिसांच्या तपासादरम्यान अवैध दारूची तस्करी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कारमधून देशी व विदेशी दारूसह एकूण ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना ८ जून रोजी रात्री वायगाव-कन्हाळगाव मार्गावर घडली. एमएच-३३ एडी-१०५६ क्रमांकाची कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत असताना समोरून येणाऱ्या एमएच-३३ वाय-०९५४ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढत वाहन जागीच सोडून दिले. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व संशयित वाहनाची तपासणी केली.
तपासादरम्यान कारमधून सुमारे १ लाख २६ हजार रुपये किमतीची देशी व विदेशी दारू आढळून आली. तसेच ४ लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. पोलिसांनी एकूण ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब), २८१, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार कारचालकाचा शोध सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन मस्के हे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
‘ड्राय’ गडचिरोलीत अवैध दारूचा शिरकाव
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी वाढत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. वैनगंगा नदीपलीकडील चंद्रपूर जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी तसेच बनावट दारूची वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातच बनावट दारू निर्मितीचे अड्डे असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
या अपघातामुळे अवैध दारू तस्करीचा मोठा डाव उघडकीस आला असून जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
