वाशिम
मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने १० जून ते १३ जून २०२६ या कालावधीसाठी जिल्ह्याचा हवामान अंदाज जाहीर केला असून १० ते १२ जूनदरम्यान येलो अलर्ट, तर १३ जून रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील हळद उत्पादकांसह सर्वच शेतकरी चिंतेत होते. जमिनीत सुकत चाललेल्या हळदीच्या कंदांसह खरीप हंगामाच्या तयारीवरही परिणाम होत होता. अशा परिस्थितीत हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र, आगामी चार दिवसांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असा असेल चार दिवसांचा हवामान अंदाज
१० आणि ११ जून : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
१२ जून : पावसाचा जोर कायम
शुक्रवारीही हवामानाचा हाच अंदाज कायम राहणार असून विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१३ जून : रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
शनिवारी १३ जून रोजी हवामान अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या दिवशी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
वादळी वारे आणि विजांचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतातील कामे करताना विशेष काळजी घ्यावी, तसेच वीज कडकडत असताना झाडाखाली अथवा मोकळ्या जागेत थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाचे अंदाज मागील काही काळात अनेकदा चुकल्याची चर्चा असली तरी यावेळी वर्तविण्यात आलेला अंदाज कितपत अचूक ठरतो, याकडे शेतकऱ्यांसह जिल्हाभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
