लोणार
लोणार तालुक्यात पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला एका पक्षाचा ‘पोस्ट’ कार्यकर्ता म्हणून ओळख देणारा एक कथित पत्रकार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर बातम्यांचा दबाव टाकून आर्थिक उकळपट्टी करत असल्याचे आरोप समोर येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीकडून प्रथम एखाद्या विभागातील कामकाजाबाबत अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत बातम्या प्रकाशित करण्याची धमकी दिली जाते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘सेटलमेंट’च्या नावाखाली आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या प्रकारामुळे प्रामाणिक पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पत्रकारितेचे काम म्हणजे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सत्य समोर आणणे आणि प्रशासनाला जबाबदार धरणे होय. मात्र, जर बातम्यांचा वापर दबावतंत्र म्हणून केला जात असेल, तर तो पत्रकारितेच्या मूल्यांवर घाला असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, नव्याने रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन किंवा सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याकडून आर्थिक लाभ उकळण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असल्याने प्रशासनातील काही घटकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच पत्रकारितेच्या नावाला काळिमा फासणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पत्रकारिता ही समाजसेवेची जबाबदारी असून ती सत्य आणि लोकहितासाठी असते, कोणत्याही प्रकारच्या दबावाचे किंवा आर्थिक व्यवहारांचे माध्यम नसावे, अशी प्रतिक्रिया सुजाण नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
