कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा; २० जूनला दिल्लीत आणखी मोठे आंदोलन

KHOZ MASTER
2 Min Read

 नवी दिल्ली/पुणे

नीट परीक्षेतील कथित गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आता आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी २० जून रोजी दिल्लीत यापूर्वीपेक्षा अधिक मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर झालेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर पक्षाने पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. पत्रकार परिषदेत बोलताना अभिजित दीपके यांनी विद्यार्थी आणि पालकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

पुण्यातही आंदोलनाची तयारी

सध्या पुण्यातही आंदोलन सुरू असल्याचे सांगताना दीपके म्हणाले की, या आंदोलनात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. आगामी आंदोलनाबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकांना केले आवाहन

पत्रकार परिषदेत दीपके यांनी देशभरातील पालकांना आपल्या मुलांना प्रश्न विचारण्यापासून किंवा शासनाला जाब विचारण्यापासून रोखू नये, असे आवाहन केले. लोकशाहीत विद्यार्थ्यांनी आपले मत मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“मी तुरुंगात जाईन, पण विद्यार्थ्यांना जाऊ देणार नाही”

आंदोलनाच्या भूमिकेबाबत बोलताना दीपके म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो, मात्र लाखो विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे शक्य नाही. आवश्यक असल्यास स्वतः तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हितासाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

जंतर-मंतरपेक्षाही मोठ्या आंदोलनाचा दावा

२० जून रोजी होणारे आंदोलन जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठे असेल, असा विश्वास अभिजित दीपके यांनी व्यक्त केला. या घोषणेमुळे विद्यार्थी आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे देशभरातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *