मुख्याध्यापक पदासाठी बनावट प्रस्ताव सादर केल्याचा आरोप; दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
सिंदखेड राजा प्रतिनिधी :
तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्व.भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक पदाच्या मान्यतेसंदर्भात मोठा वाद उफाळून आला असून, बनावट अभिलेख तयार करून शिक्षण विभागाची दिशाभूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित मुख्याध्यापक पदाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी द फ्रेंड एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सूर्यकांत हिंमत पवार यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, शाळेतील सहाय्यक शिक्षक रमेश विश्वनाथ कंकाळ यांना मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळवून देण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापनाकडून बनावट अभिलेख तयार करण्यात आले. तसेच शिक्षण विभागाला चुकीची माहिती देत शासनाची दिशाभूल व फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद प्रताप सरकटे यांचा कार्यकाळ ३१ मे २०२५ पर्यंत अस्तित्वात असताना, त्यापूर्वीच रमेश कंकाळ यांच्या नावाने मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच कार्यकारी मंडळाची सभा नोटीस व ठरावही बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित प्रस्तावासोबत जोडण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये दिनांकांमध्ये विसंगती असल्याने संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
सूर्यकांत पवार यांनी तक्रारीत असेही म्हटले आहे की, मुख्याध्यापक पदासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावासोबत न्यायालयीन वाद नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात संबंधित संस्थेविषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय, सेवाजेष्ठ शिक्षकांकडून देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित शिक्षकांनी ज्या तारखेला प्रमाणपत्र दिले, त्या दिवशी मुख्याध्यापक पद रिक्तच नव्हते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक आणि काही सेवाजेष्ठ शिक्षक यांच्या संगनमतातून बनावट कागदपत्रांची निर्मिती करण्यात आल्याचा आरोप करत, शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात यापूर्वीही शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप सूर्यकांत पवार यांनी केला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या गंभीर आरोपांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, विभागीय शिक्षण उपसंचालक आता या प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
