अभियंत्याला हटवून चौकशी अधिकाऱ्याने स्वतःच घेतला खुर्चीचा ताबा !

KHOZ MASTER
3 Min Read

बुलढाणा, दि. १३
आजवर राजकीय पक्षांमध्येच खुर्चीसाठी राजकारण होत आल्याचे लोक पाहात आले आहेत. मात्र, खुर्चीसाठी प्रशासनातही चढाओढ लागल्याचे दिसून येते. तसा प्रकार येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीबाबत घडल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. तत्कालीन अधिकाऱ्याला हटवून खुर्चीचा ताबा घेण्यासाठी नाट्यमय घडामोडी खेळल्या गेल्या. दोन विशेष तक्रारकर्त्यांना पुढे करून कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराबाबत मंत्रालयापर्यंत तक्रारी करण्यात आल्या. या प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्यात आल्या. या माध्यमातून ‘त्या’ अधिकाऱ्याला बदली करवून घेण्यास भाग पाडण्यात आले. चौकशी उपसमितीत असलेले जितेंद्र काळे हेच रिक्त झालेल्या कार्यकारी अभियंता पदावर रुजू झाले. चौकशी समितीमध्ये असलेला अधिकारी ज्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याकरिता येतो, तोच त्या पदावर कसा बसू शकतो? ही नियमांची पायमल्ली नाही का? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून मंत्रालयस्तरापर्यंत करण्यात आल्या. तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी विशेष दोन व्यक्तींना पुढे करण्यात आले. त्या तक्रारींची चौकशी
करण्यासाठी चौकशी समिती व उपसमिती नेमण्यात आली. अकोला येथील मंडळ कार्यालयाच्या अधीक्षक अभियंत्यांनी नेमलेल्या समितींनी चौकशीदेखील सुरू केली. या माध्यमातून मोठा दबावगट निर्माण झाल्याने सुभाष राऊत यांना येथून बदली करून घेण्यास भाग पाडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रिक्त झालेल्या या पदावर जितेंद्र काळे यांची थेट मंत्रालयातून बदली झाली. काळे हे खामगाव येथील कार्यालयात उपकार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. बुलढाणा येथे येण्याच्या काही महिन्यांपूर्वी त्यांची कार्यकारी अभियंता पदावर बढती झाली होती. मात्र, त्यांच्यासाठी पद रिक्त नसल्याने ते अडगळीत पडले होते, अशी माहिती आहे. तत्पूर्वी या पदावर बसण्याची संधी थेट मंत्रालयातून काळे यांना मिळाली. तक्रारींच्या आधारावर सुरू झालेल्या चौकशीच्या काळातच खुर्चीचा ताबा मिळविला गेला, हे विशेष !
प्रशासनात सुरू असलेली ही खेकडावृत्ती प्रशासकीय
कामकाजाच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरू शकते, हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समजून घ्यायला हवे, अशी चर्चासुद्धा यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्तुळात होत आहे.२३ जानेवारीला चौकशी, ३० तारखेला ऑर्डर
बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी कार्यालयात अनियमितता, भ्रष्टाचार व शासन निर्णयांचे उल्लंघन करून भ्रष्टाचार केल्याच्या तक्रार प्राप्त झाल्या. २१ जानेवारी २०२५ रोजी चौकशी समितीचे अध्यक्ष खामगावचे कार्यकारी अभियंता यांनी पत्र पाठवून २३ जानेवारी २०२५ ला चौकशी समिती येत असल्याचे सांगितले. १ ते ११ मुद्यांची तपासणी करण्यासाठी ही समिती दाखल झाली. चौकशी उपसमितीमध्ये अध्यक्ष म्हणून जितेंद्र काळे यांचा समावेश होता. २३ जानेवारीला समितीत येऊन गेलेले काळे यांची ३० जानेवारी २०२५ रोजी बुलढाणा येथेच कार्यकारी अभियंता पदी बदली झाली आणि दुसऱ्या दिवशी ३१ जानेवारी २०२५ ला ते रुजू झाले. चौकशी सुरू असताना अवघ्या आठ दिवसांतच ते कार्यकारी अभियंता पदावर बसल्याने शंकेला वाव मिळत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *