चिखली, दि. १३ (प्रतिनिधी)
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पक्षश्रेष्ठींचे पाठबळ लाभलेले समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड झाली.
या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र घोंगे यांनी कामकाज पाहिले. या संपूर्ण प्रक्रियेला बाजार समितीच्या दोन संचालकांचा अपवाद वगळता सर्व संचालक उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींकडून सभापतीपदासाठी समाधान सुपेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांच्या उमेदवारीचे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही अन्य उमेदवाराचा अर्ज शिल्लक नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
यावेळी सुपेकर यांच्या निवडीचा जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. तसेच या निवडीबद्दल शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समिती कार्यक्षेत्रातील घटकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी श्रीकिसन धोंडगे, गणेश थुट्टे, परमेश्वर पवार, श्रीकृष्ण मिसाळ, पांडुरंग भुतेकर, संतोष वाकडे, कमल कुळसुंदर, मंदाबाई भुतेकर, रामेश्वर जाधव,
संतोष वानखेडे, रामेश्वर खेडेकर, मनोज लाहुडकर, समाधान परिहार, संजय गवई, राजेश पवार आदी संचालक उपस्थित होते.
व्यापाऱ्यांचा सोमवारी बाजार बंद; सुनावणीसाठी बुलढाण्यात हजेरी
एकीकडे या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण असले तरी, नवनियुक्त सभापतींसमोर पदभार स्वीकारताच सुरुवातीलाच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. व्यापारी संघटनेच्या विविध मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही.
एमआयडीसी परिसरात बाजार
समितीचा परवाना नसताना काही व्यापारी अवैध रित्या नियमित शेतमाल खरेदी विक्रीचा व्यापार करतात. या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी असोसिएशनने १५ मे २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधकांना तक्रार दिली होती. त्यावरून एमआयडीसीमध्ये या व्यापाऱ्यांच्या खासगी गोदामावर तपासणी झाली. त्या अहवालावर सोमवार, १५ जून रोजी सुनावणी होणार आहे. त्या निवेदनावर सर्व आडते खरेदीदार यांना सुनावणीसाठी बुलढाणा येथे हजर राहावे लागणार असल्याने बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. यानंतरही कार्यवाही झाली नाही तर असोसिएशन लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असे कैलास शर्मा यांनी सांगितले. परिणामी नवीन येणाऱ्या सभापतींना सुरुवातीलाच या बाजार बंदच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असून व्यापाऱ्यांच्या या मागण्या पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
चिखली बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर
Leave a comment
