बुलढाणा : प्रतिनिधी
बुलढाणा येथे १६ जून रोजी पार पडलेली गुन्हे परिषद सध्या जिल्हा पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनी घेतलेल्या या मासिक आढावा बैठकीत गुन्हेगारी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नेहमीच्या बैठकींपेक्षा ही बैठक अधिक चर्चात्मक आणि कठोर सूचनांमुळे गाजल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक, दोन्ही अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध शाखांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार, विनयभंग, अॅट्रॉसिटी, जुगार, गुटखा, अंमली पदार्थ, अवैध दारू, शस्त्र कायदा तसेच अपघातांच्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
गुन्ह्यांची संख्या, तपासाची प्रगती आणि प्रतिबंधात्मक कारवायांचा आढावा घेतल्यानंतर आयजी महेश पाटील यांनी कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत “शंभर टक्के रिझल्ट लागेल म्हणजे लागेल” असा कडक संदेश देत गुन्हे नियंत्रणासाठी ठोस कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. या सूचनेनंतर काही ठाणेदारांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईचा वेग वाढवण्याची तयारी सुरू केली आहे.
कर्तव्यात हलगर्जीपणा आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील आयजींनी पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पोलीस ठाण्यांच्या कामकाजावर वरिष्ठांची थेट नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, बुलढाणा येथील बैठक संपल्यानंतर आयजी महेश पाटील यांनी खामगाव येथे जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीतील राजुरा शिवारातील ‘सरकटी लाश’ प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. तपास अधिकारी आणि पथकांना मार्गदर्शन केल्यानंतर ते अमरावतीकडे रवाना झाले.
आयजींच्या या कठोर आढाव्यानंतर बुलढाणा पोलीस दलात आता गुन्हे नियंत्रण आणि कारवाईचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
