साखरखेर्डा येथे १८ लाखांचा गुटखा जप्त अन्न व औषध प्रशासन, एलसीबी व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; दोन आरोपी फरार

KHOZ MASTER
2 Min Read

साखरखेर्डा : प्रतिनिधी

साखरखेर्डा येथे अवैध गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरखेर्डा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान दोन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून, दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून साखरखेर्डा परिसरात अवैध गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. १७ जून रोजी सकाळी ७ वाजता अन्न व औषध प्रशासन अधिकारी भोपळे यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

पहिली कारवाई शेख इब्रान शेख चाँद कुरेशी यांच्या घरावर करण्यात आली. घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीतून विविध प्रकारचा गुटखा आढळून आला. पंचनामा केल्यानंतर ६ लाख ७२ हजार ९११ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

यानंतर शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. येथे विविध प्रकारचा गुटखा आढळून आला असून, पोलिसांनी कारवाई करत ११ लाख ४९ हजार १० रुपयांचा गुटखा जप्त केला.

कारवाईच्या वेळी दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन अधिकारी भोपळे, ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे, बाजड तसेच पोलीस अंमलदार गजानन दराडे, दिनेश बकाले, युवराज राठोड, ज्ञानदेव टेकाळे, मनोज खर्डे, रोहिदास पवार, लक्ष्मण इनामे आणि जनाबाई केवट यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *