मलकापूर : प्रतिनिधी
पैशांच्या हव्यासापोटी फसवणुकीचा नवा प्रकार मलकापूरमध्ये समोर आला असून, चिल्ड्रन बँकेच्या बनावट नोटा देऊन नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल ठगांना मलकापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
मलकापूर शहरातील गोपाळकृष्णनगर परिसरात १६ जून रोजी हैदराबाद येथील दोन व्यक्तींना ३५ हजार रुपयांच्या बदल्यात ३ लाख ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र, मलकापूर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने वेळीच कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणला.
या कारवाईत ईश्वर अशोक मेसरे (रा. नरवेल, ता. मलकापूर, ह.मु. यशोधाम कॉलनी, मलकापूर) आणि गौतम मुकुंदा तायडे (रा. रमाईनगर, मलकापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता, भारतीय चलनातील ५०० रुपयांची एक खरी नोट वर ठेवून त्याखाली चिल्ड्रन बँक लिहिलेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ६९९ बनावट नोटा लपवून ठेवल्याचे आढळून आले.
पोलिसांनी आरोपींकडून भारतीय चलनातील ५०० रुपयांची एक नोट, चिल्ड्रन बँकेच्या ५०० रुपयांच्या ६९९ बनावट नोटा, गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची ज्युपिटर दुचाकी तसेच ओपो, रियल मी, ऑनर आणि ओपो ए५७ कंपनीचे चार अँड्रॉइड मोबाईल जप्त केले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ५० हजार ५०० रुपये असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या आदेशाने करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, पोलीस अंमलदार आसिफ शेख, नवल राठोड, गणेश बर्डे, संतोष कुमावत, योगेश तायडे, प्रविण गवई आणि दीपक सोनोने यांनी ही कारवाई केली.
