प्रविण चव्हाण नंदुरबार
घरफोडी करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, घरफोडीचे गुन्हे उघड.
सविस्तर माहिती अशी कि,
मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्द्तीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते. पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकीस आणणेे हे मोठे आवाहन होते.
त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्ड वरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेल मधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.
दिनांक 20 ऑक्टोबर चे 21.30 ते दिनांक 21 ऑक्टोबर चे 07.30 वा. दरम्यान महेश कोमलसिंग गिरासे (वय-33 ) व्यावसाय मेडीकल शॉप रा. शाहूनगर, नळवा रोड, नंदुरबार यांचे मालकीचे नंदुरबार शहरातील गांधीनगर परिसरात रिक्षा स्टॉप जवळ असलेले न्यू आरती मेडीकलच्या शटर चे कुलुप तोडून टेबल चे ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले 15,000/- रु. रोख अज्ञात आरोपीने चोरुन नेले म्हणून, महेश कोमलसिंग गिरासे (वय-33) व्यावसाय मेडीकल शॉप रा. शाहूनगर, नळवा रोड, नंदुरबार यांचे फिर्यादी वरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 745/2022 भा.द.वि.कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक 29 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सुमारे एक ते दिड महिन्यापूर्वी नंदुरबार शहरातील न्यू आरती मेडीकल शॉप येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील CCTV फुटेज मध्ये दिसत असलेल्या वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम नंदुरबार रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे, त्यावरून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदरची माहिती, एल. सि. बि. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक. किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार रेल्वे स्थानक परिसरात एक इसम संशयास्पदरित्या फिरत असतांना मिळून आला. त्यास विचारपूस केली असता तो मुकबधीर असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणले, परंतु संशयीत इसम मुकबधीर असल्यामुळे त्यास विचारपूस करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडे होते. पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव दगडूबा मुकुंदा बोर्डे (वय-32) रा. पेरजापूर ता. भोकरदन जि. जालना असे एका कोऱ्या कागदावर लिहून सांगितले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात 7,540/- रुपये रोख मिळून आल्याने त्यास सदर पैशांबाबत विचारपूस केली असता त्याने सुमारे 1 महिन्यापूर्वी नंदुरबार शहरातील एका मेडीकल दुकानात रात्रीच्या वेळी चोरी केल्याचे हातवारे करुन व कागदावर लिहून सांगितले, म्हणून सदर चे पैसे कायदेशीर कारवाई करुन जप्त केले.
तसेच त्यास मुकबधीर इसमांची भाषा माहिती असलेल्या मुकबधीर विद्यालयातील शिक्षकांकडून इतर चोरीच्या घटनांबाबत विचारपूस केली असता त्याने खांडबारा, अक्कलकुवा, रनाळे, जळगांव जिल्ह्यातील भुसावळ व साक्री जि. धुळे या ठिकाणी चोरी केल्याचे हातवारे करुन व कागदावर लिहून सांगितले. त्यावरून जिल्हा घटाकातील व इतर जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथे गुन्हे अभिलेख पडताळून पाहिले असता.
खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समजुन आले.
नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 745/2022 भा.द.वि. कलम 457,380.
नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 411/2022 भा.द.वि. कलम 457,380.
विसरवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 396/2022 भा.द.वि. कलम 461,457,380.
अक्कलकुवा पोलीस ठाणे गु.र.नं. 489/2022 भा.द.वि. कलम 457,380.
साक्री जि. धुळे पोलीस ठाणे गु.र.नं. 384/2022 भा.द.वि. कलम 457,380.
बाजार पेठ भुसावळ पोलीस ठाणे जि. जळगांव गु.र.नं. 478/2022 भा.द.वि. कलम 457,380
ताब्यात घेण्यात आलेला दगडूबा मुकुंदा बोर्डे (वय-32 ) रा. पेरजापूर ता. भोकरदन जि. जालना याचेविरुध्द् महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जळगांव, नाशिक येथे घरफोडी व चोरीचे एकुण 31 गुन्हे दाखल आहेत.
दगडूबा मुकुंदा बोर्डे (वय-32 )रा. पेरजापूर ता. भोकरदन जि. जालना यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे,
असे पोलीस अधीक्षक.पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो. हवालदार महेंद्र नगराळे, पो.ना.राकेश मोरे, मोहन ढमढेरे, पोलीस शिपाई अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.
Users Today : 30