तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
किटकशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे व येत्या पंधरवड्यात हे पिक फुलोऱ्यावर येईल. मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या तूर पिकाची पाहणी करून वेळीच उपाययोजना करावी असे आवाहन पुणे कृषि आयुक्तालयाचे कृषि सहसंचालक डॉ.तुकाराम मोटे यांनी केले आहे.
शेंगा पोखरणाऱ्या अळयांमध्ये पुढील प्रकारच्या अळयांचा समावेष होतो. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) : या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करडया रंगाची असून तीच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठया अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंग : या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाणे पोखरते. शेंगे माशी: या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याचे नुकसान होते.एकात्मिक व्यवस्थापन : या तीनही किडी कळया, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय करावेत. शेतात प्रति हेक्टर २० पक्षी थांबे उभारावेत त्यामुळे पक्षी किडींच्या अळया खाऊन फस्त करतील. अळयांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे त्यामुळे झाडावरील अळया पोत्यावर पडतील त्या गोळा करुन नष्ट कराव्यात. किडींच्या नियंत्रणासाठी 50 टक्के फुलोरा असतांना निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझॅडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली, किंवा अझॅडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.एच.एन.पी.व्ही. 500 एल.ई किंवा बॉसिलस थुरिंनजिएसिस 15 मिली, क्विनॉलफॉस 25 ई.सी 3 ग्रॅम 10 लिटर पाण्यात पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी यासाठी इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के 3 ग्रॅम, एस. जी. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही 10 मिली, किंवा ईथिऑन ५० टक्के  ईसी 4 मिली, किंवा क्लोरॅनट्रीनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. 2.5 मिली 10 लिटर पाण्यात फवारणी करुन तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळ्यांचे व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *