बोगस कॉल सेंटरद्वारे नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड : स्थानिक गुन्हे शाखेकडून 03 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या.

Khozmaster
6 Min Read

स्थानिक गुन्हे शाखेकडून 03 जणांच्या टोळीला अटक.

प्रविण चव्हाण

नंदुरबार -: गेल्या अनेक दिवसा पासून सदरचे बोगस कॉल सेंटर चालू असल्याची माहिती मिळताच,
नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांनी धाड टाकून या आंतरराज्य टोळीला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या 03 आरोपीतांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारे 05 महागडे मोबाईल फोन, सिम कार्ड, डेबिट कार्ड, असा सुमारे 2 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,
आजच्या आधुनिक युगात अन्न, वस्त्र आणि निवारा इतकीच मोबाईल सुध्दा आता माणसाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे सर्व सामान्य लोकांचा बराचसा वेळ,त्रास कमी झालेला आहे. मोबाईलद्वारे बरीचशी कामे नागरिक घरी बसल्या ऑनलाईन पध्द्तीने करु शकतात. परंतु ऑनलाईन काम करीत असतांना बऱ्याचवेळा नागरिकांची फसवणूक देखील होत असते. अशाच एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने केला.

14 डिसेंबर 2022 रोजी पी.आर.पाटील पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना गुप्त बातमी मिळाली की, अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही गावात एका घरात गुजरात राज्यातील सुरत येथून आलेले काही तरुण राहात असून ते इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हीआयपी मोबाईल नंबर विक्रीची जाहिरात करुन ते नंबर विकत घेण्यासाठी फोन करणाऱ्या ग्राहकांना व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून त्यांचे कडून फोन पे, गुगल पे, पेटीएम किंवा इतर माध्यमातून पैसे घेवून त्यांना कोणत्याही प्रकारचे मोबाईल नंबर न देता त्यांची फसवणूक करीत आहेत.
अशी बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत इसमास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही गावात जावून मिळालेल्या बातमी प्रमाणे माहिती घेतली असता, जावीद निजामोद्दीन मक्राणी याचे घरात गुजराज राज्यातील सुरत येथून दोन इसम आलेले असून त्यांच्या मदतीला गावातील एक इसम असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी राजमोही गावात जावीद निजामोद्दीन मक्राणी यास सुरत येथून आलेले तरुण कोठे आहेत ? असे विचारले असता, त्याने ते घराच्या छतावर त्यांचे ऑनलाईन काम करीत असल्याचे सांगितले. त्यावरून पथकाने जावीद मक्राणी याचे घराचे छतावर तीन तरुण खाली बसून मोबाईलवर काही तरी करतांना दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेले आरोपी यासीन रईस मक्राणी (वय-19 रा. घर नंबर-302, अल रहेमत अपार्टमेंट, कॉझवे सर्कल, रांदेर सुरत ह.मु. मोठी राजमोही ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार ) एजाज तमीजोद्दीन मक्राणी (वय-25, रा.मोठी राजमोही ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार) यशराज विजयसिंह महिदा (वय-25, रा. 301-ए, भूमी कॉम्प्लेक्स, हनीपार्क रोड, सुरत) ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडून 2 लाख 49 हजार रुपये किमतीचे 05 विविध कंपनीचे महागडे मोबाईल, सिम कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी साहित्य कायदेशीर कारवाई करुन जप्त करण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या संशयीतांना विचारपूस केली असता, त्यांनी अतिशय धक्कादायक अशी माहिती सांगितली की, त्याचे कडील मोबाईल वर इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हीआयपी मोबाईल नंबर विक्रीची जाहिरात करुन ते नंबर विकत घेण्यासाठी फोन करणाऱ्या ग्राहकांना मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून त्यांचे कडून बँक अकाऊंटवर पैसे स्वीकारून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा व्हीआयपी नंबर न देता ग्राहकाची आर्थिक फसवणूक करीत होतो या बाबत सांगितले.
त्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षणा बाबत विचारपूस केली असता यशराज महिदा हा डिप्लोमा इंजिनिअर असून यासीन हा इयत्ता 10 वी तर एजाज हा इयत्ता 9 वी पास असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांविरुध्द् अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता कलम 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपीतांनी मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत भारतातील कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांमधील नागरिकांची व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केली असल्याचे सांगितले.

सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून, गुन्ह्याच्या खोल पर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेवून त्यांचे वर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही गय केली जाणार नाही व तिघांनी अशा प्रकारे अनेकांना फसविल्याची शक्यता असून या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता नंदुरबार पोलिसांनी वर्तवली असून,त्यादृष्टीने देखील तपास करण्यात येईल,

असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचे मार्गदर्शना खाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पो. हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पो. ना.मनोज नाईक, बापु बागुल, विशाल नागरे, जितेंद्र अहिरराव, दादाभाई मासुळ, मोहन ढमढेरे, पंकज महाले, हितेश पाटील, तुषार पाटील, दिपक न्हावी, राजेंद्र काटके,शोएब शेख आदी पथकाने केली असुन,

नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन शॉपींग साईट वरुन कोणत्याही अमीषाला बळी पडु नये, अनोळखी व्यक्तीच्या बँक अकाऊंट मध्ये किंवा पेटीएम द्वारे खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यावहार करु नये जेणे करुन आपली कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक होणार नाही.

अशा प्रकारचे कॉल आल्यास किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास समक्ष जावुन संपर्क साधावा.

पी.आर.पाटील
पोलीस अधीक्षक, नंदुरबार

0 9 4 7 1 1
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *