मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार
शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन 2022-2023 वर्षांसाठी भारत सरकार शिष्यवृत्तीअंतर्गत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी नविन शिष्यवृत्ती अर्ज भरणे तसेच शिष्यवृत्ती अर्ज नूतनीकरण करण्याची प्रक्रिया 29 सप्टेंबर,2022 पासून सुरु असून अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर अर्ज भरावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर यापूर्वी आधार संलग्नित यूजर आयडी तयार करुन अर्ज भरला आहे त्यांनी नवीन नॉन आधार यूजर आयडी तयार करु नये. शिष्यवृत्ती ही शासनाच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांना वितरीत होत असल्याने विद्यार्थ्यांचे बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असून ते आधार संलग्न असावे. यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यास अडचण येत नाही. तरी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्वरीत अर्ज सादर करावे असे श्री.नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
